श्री स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे अनेक सण, उत्सव साजरे केले जातात. त्यातील सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे महाराजांचा जयंती उत्सव.
अनंतकोटी ब्रम्हांडनायक संपूर्ण चराचरात भक्तकल्याणासाठी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा आश्वासक शब्द सतत ज्यांच्या मुखातून येतो, ती विश्वाची माऊली, कृपेची साऊली पृथ्वीतलावर अवतार घेते. संपूर्ण जगभरात स्वामींचे अनेक भक्त आहेत. मनापासून आर्त हाक दिली की प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. नम्रभावनेनी आणि शरणागतीने उपासना मार्गावर सेवा कार्यात स्वतःला समरसून सक्रिय करावे. या महान कार्यात आपला खारीचा वाटा असावा अशा उद्देशाने स्वामी नामाची ध्वजा हाती घ्यावी, तनमन आणि धनाने या उत्सवास सहभागी व्हावे आणि जीवनाचे सार्थक करावे
उपासकांच्या मर्मबंधातील जणू रेशीमठेव आहे ही. स्वामी आपले तारक, रक्षण करणारे आहेत हा ठाम विश्वास मनी बाळगावा हीच तळमळ आपल्या ठायी सदा रहावी. स्वामींची जयंती म्हणजे भक्तांना सुखाची पर्वणीच. हेच सुख अनुभवण्यासाठी, हा चैतन्यसोहळा पाहण्यासाठी स्वामींच्या कृपेस पात्र होण्यासाठी भक्त तळमळीने लांबून लांबून येत असतात. भक्तांच्या अलोट गर्दीत हा परमोच्च आनंदाचा सोहळा श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, डोंबिवली (पूर्व) येथील सद्गुरू चैतन्यस्वरूप भालचंद्र द. लिमये (अण्णा) व लक्ष्मीस्वरूप सौ. सुषमा भा. लिमये (आई) यांच्या निवासस्थानी १९७४ पासून अखंड अविरत आजपर्यंत सुरु आहे. अनेक भक्तमंडळी याची अनुभूती घेत आहेत
या उत्सवाची रूपरेषा खालीलप्रमाणे सादरचैत्र शुद्ध द्वितीयेस आणि तृतीयेस असा दोन दिवस साजरा होणारा जयंती उत्सव. दिनक्रमात ज्या पूजा संपन्न होतात त्यासाठी जयंती उत्सवाच्या सभेत उपस्थित सेवेकऱ्यांमधून चिट्ठ्या टाकून सेवा दिली जाते. सर्व सेवा वाटप चिट्ठ्या काढून स्वामींच्या आदेशानुसारच ठरवल्या जातात. चिट्ठीतील नावाप्रमाणे एका दाम्पत्याची निवड केली जाते. दरवर्षी याच प्रथेप्रमाणे भक्तिभावनेनी सद्गुरूंनी आखून दिलेल्या परंपरेनी उत्सव साजरा होतो.
सद्गुरुंच्या निवासस्थानाहून गणेशकृपा ते नांदिवली मठ वास्तूत सदर परिक्रमा करत पहाटे ५.३० वा. फुलांनी सजवलेल्या पालखीतून भव्य मिरवणूक स्वामी नामाच्या घोषात ध्वज, अब्दागिरी, चवरी, पंखा आणि सोबत ढोल ताशाच्या गजरात पालखी निघते. अनेक भक्तांना या पालखीचे भोई होण्याचे भाग्य मिळते. टप्पे घेत घेत पालखी नियोजित स्थळी विराजमान होते. अवकाशात दुमदुमून जाईल या जल्लोषात स्वामीनामाचा गजर होतो. हा सोहळा याची देही याची डोळा पहण्यास येणारा भक्त भाग्यवंत. स्वामी नामाचा महिमाच अलौलिक, अपरंपार आहे. या उत्सवाचे आपणही साक्षीदार व्हावे यासाठी दिनक्रमासहित आपणांस माहिती देत आहोत
चैत्र शुद्ध द्वितीयापहाटे ५.३० वा. श्रींच्या पादुकांची पालखीतून भव्य मिरवणूक |
गणेशकृपेतून नांदिवली मठात पालखीचे आगमन झाल्यावर पादुका चौरंगावर ठेवून महाराजांना हार व मुकुट घालण्यात येतो. त्या नंतर मोठ्या समयांच्या ज्योती प्रज्वलित करून उत्सवास प्रारंभ होतो |
सकाळी ८ ते ९ : महापूजा, जन्मोत्सव, आरती व दर्शन |
सकाळी १० ते १२ : शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम |
दुपारी १२ ते २ : महाप्रसादास सुरुवात. श्री स्वामींना नैवेद्य अर्पण करून शिस्तीने,शांतपणे व स्वच्छता या सर्व गोष्टींचे पालन करून सुव्यवस्थेनी दिला जातो |
दुपारी २.३० ते ६ : नामांकीत व्यक्तीचे गायन अथवा भजनाची सेवा. |
संध्याकाळी ६ ते ७ : सायं. आरती व दर्शन. |
संध्याकाळी ७.३० ते १० : दिग्गज नामवंत गायकांची प्रमुख गायनसेवा (ही गायनसेवा सादर करून अनेक कलाकार प्रगतीच्या वाटेवर स्वामींच्या आशिर्वादाने आपले कार्य करीत आहेत) |
या दिवसाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कोठीघरात चैत्रगौर माहेरवाशीण म्हणून पाळण्यात अक्षयतृतीयेपर्यंत विराजमान असते. महिनाभर नैवेद्य, आरती, पूजा यथासांग होत असते. अक्षयतृतीयेस हळदीकुंकू समारंभ पार करून गौर विसर्जित होते |
सकाळी ७.३० ते ९ : श्रींची पूजा सहस्त्रनामावली. ही १००० बिल्वपत्रांची पूजा असते. त्यानंतर मानसपूजा या पूजेतील सामुग्रीने श्रींच्या चरणांवर अर्पण करून शांतस्वरात म्हटली जातांना अभिषेक केला जातो |
सकाळी ९ ते १० : नामवंत गायकांची गायन सेवा |
सकाळी १० ते ११ : महाराजांना आदिमायेचे स्वरूप देण्याची तयारी. |
सकाळी ११ ते १२ : “अनुबोध” भजनीमंडळाचा जोगव्याचा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ महाराज यावेळी आदिशक्ती आदिमायेच्या स्वरूपात भक्तांना आईची माया उदंड शक्तीचा स्रोत भरभरून देण्यासाठी विराजमान असतात. लक्ष्मीस्वरूप आई-सद्गुरूंची कन्या सौ. माधुरीताई घाटे, इतर महिला सेवेकरी स्वामी माऊलींकडे विश्वकल्याणाचा जोगवा मागण्याची प्रथा परंपरेने सुरु आहे. याचे प्रासादिक तांदूळ भक्तांना प्रसादाची उदंड प्रचिती देत आहेत असा अनुभव आहे |
दुपारी १२.३० ते २ : नैवेद्य व महाप्रसाद. |
दुपारी २.३० ते ३.३० : पुरुषोत्तम भजनी मंडळ (मठातील सेवेकऱ्यांची भजन सेवा) |
दुपारी ३.३० ते ५.०० : काल्याचे किर्तन |
संध्याकाळी ६ : सायं आरती. यानंतर पुढील वर्षाची उत्सवाची तारीख जाहीर करून “वंदे मातरम” म्हणून उत्सवाची सांगता होते. कोणत्याही घोषणा यानंतर दिल्या जात नाहीत |
संध्याकाळी ७ : श्रींच्या पादुकांचे प्रस्थान नांदिवली मठातून सद्गुरुंच्या निवासस्थानाकडे पालखीचे टप्पे घेत घेत फुलांनी सजवलेल्या पालखीतून पादुकांची मिरवणूक नगर परिक्रमा करत ९ वाजेपर्यंत नियोजीत स्थळी विराजमान होते |