स्थापना – १४ जानेवारी १९९३
संस्कारक्षम वयातील मुलांवर उत्तम संस्कार करुन त्यांना चांगले नागरीक बनविण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील अशी आमची संस्था १९९३ पासून कार्यरत आहे
आमची वैशिष्ट्ये
स्तोत्र आणि श्लोक पाठांतर | 80-G सर्टिफिकेट |
स्नेहसंमेलन | आंतरशालेय रंगभरण, चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा |
बौद्धिक खेळ | वर्गाच्या विविध स्पर्धा |
योगासने आणि व्यायाम | राष्ट्रीय व पारंपरिक सण आणि उत्सव साजरे करणे |
दिवाळी शिबिर | बालवाचनालय |
कार्याचा थोडक्यात आढावा
उमलत्या पिढीवर उत्तम सुसंस्कार करणारी आमची नंदकिशोर संस्कार केंद्र हि संस्था गेली २८ वर्षे सतत कार्यरत आहे
संस्कारक्षम वयातील मुले सतत टी.व्ही. आणि मोबाईल समोर असतात. त्यांच्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव पडू नये. आपल्या पूर्वापार चालत आलेल्या ज्ञानाचा वारसा हा पुढे नेला पाहिजे ही तळमळ सद्गुरू चैतन्यस्वरूप ती.अण्णा तसेच लक्ष्मीस्वरूप सौ.आई ह्यांना होती. लहान मुलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावना होती. सद्गुरू अण्णांच्या पाठिंब्याने आईंनी पुढाकार घेऊन १४ जानेवारी १९९३ ला संक्रांतीचा मुहूर्तावर गोविंदानंद श्रीराम मंदिर येथे अवघ्या ४-५ मुलांना घेऊन संस्कार वर्ग सुरु केला. ह्या संस्कार वर्गाच्या माध्यमातून ज्ञानदानाचा वसा त्यांनी पालकांना व मुलांना दिला. आणि हे सर्व पालकांना इतके आवडले कि अनेक मुले येऊ लागली, ह्या सर्वांबरोबरच आईंच्या मदतीला मठातील महिला सेवेकरी येऊ लागल्या. वाढती मुलांची संख्या लक्षात घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी अनेक शाखांची निर्मिती करण्यात आली आणि त्यातूनच "नंदकिशोर संस्कार केंद्र" हि संस्था "रजिस्टर्ड" करण्यात आली. प्रत्येक शाखेची मावशी शिकवायला होती, त्यांना मावशी का म्हणायचे? तर घरात "आई" व शाळेत "बाई" म्हणून सर्वात जवळचे नाते मावशीचे म्हणून सर्व नंदकिशोरांना "मावशी" म्हणायला शिकवले, इथूनच खरी संस्काराची सुरुवात झाली.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजेच, बौद्धिक, शैक्षणिक आणि कलेच्या विकासासाठी अनेक उपक्रम ठरविण्यात आले.
प्रथम आठवड्यातून ३ वार संस्कार वर्ग घेण्याचे ठरविले वेळही ठरविण्यात आली. त्यामध्ये प्रथम छोटे श्लोक, स्तोत्र, गाणी, गोष्टी अगदी "कराग्रे वसते लक्ष्मी" पासून रामरक्षा, अथर्वशीर्ष सर्व मोठी स्तोत्रे शिकवली जातात
ह्या सर्वांबरोबरच त्यांच्यातील कलेला वाव मिळाला म्हणून स्नेहसंमेलन उपक्रम व प्रदर्शन करण्यात येते. एक विषय घेऊन वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन ह्यासाठी अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे
ह्या सर्वांबरोबरच राष्ट्रीय व पारंपरिक सणांची माहिती देऊन काही छोटे सण वर्गात साजरे केले जातात. राखी पौर्णिमा, दहीहंडी, श्रावणी शुक्रवार, नागपंचमी, दिवाळीत शिबिरामध्ये किल्ला बनवणे, आकाशकंदील, पणती सजवणे असे उपक्रम करून घेतले जातात
हे सर्व नंदकिशोरांकडून करून घेता यावे, श्लोकांचे सुस्पष्ट उच्चार करून घेणे, त्यांना घडवण्याचे जे कार्य आहे ते मावशी करतात. त्यासाठी त्यांना ह्या सर्वांचे प्रशिक्षण दिले जाते. ह्यासाठी मावशींचीही वेगवेगळी शिबिरे आयोजित केली जातात
ह्या शिबिरांमधून स्वतः सद्गुरू अण्णा व आई ह्यांनी मार्गदर्शन केलेच पण इतरही अनेक तज्ञांनी यात वेळोवेळी मार्गदर्शन केले, जसे "आहारतज्ज्ञ- मालती कारवारकर", "क्राफ्ट" (हस्तकला)- माधुरी घाटे." "घरगुती आयुर्वेदिक औषधांची माहिती- डॉ. वेलणकर", प्रा. सुरेंद्र बाजपेयी, डॉ. श्रीरंग जोशी, श्री. चंद्रकांत जोशी, श्री. राजीव तांबे, माधवी घारपुरे
ह्या सर्वांचा लाभ मावशींनी तर घेतलाच पण त्याचा सदुपयोग ही त्यांनी नंदकिशोरांसाठी केला.अशा विविधतेनं परिपूर्ण असलेल्या संस्थेत लवकरच प्रवेश घ्या
ग्रहणशील पिढीतील नीतिशास्त्र आणि मूल्ये विकसित करण्याच्या दिशेने काम करणारी संघटना