राम मंदिर

‘श्री गोविन्दानंद श्री राम मंदिर’हे डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती असलेल्या रामनगर प्रभागात आहे. ह्या मंदिराचे मूळ संस्थापक हे राष्ट्रीय कीर्तनकार श्री गोविन्दानंद स्वामी आफळे. १९८५ साली श्री स्वामीसमर्थ सेवा मंडळाने आफळेबुवांकडून राम मंदिरात गुरुवारची आरती करण्याची परवानगी मिळवली .काही दिवसातच मंडळाचे कार्य त्यांच्या कानी पडले आणि अत्यंत आनंदाने १५ मे १९८६ रोजी त्यांनी हे मंदिर प. पू. सद्गुरू श्री चैतन्यस्वरूप उर्फ ती. अण्णांच्या स्वाधीन केले. सद्गुरू ती. अण्णा व सद्गुरू ती. आईंनी ह्या मंदिराचा अक्षरशः जीर्णोद्धार केला. सर्व प्रथम मंदिर स्वच्छ केले. ही स्वच्छता करण्यासाठी मजूर लावले नव्हते. स्वतः सद्गुरू आणि त्यांच्या सेवेकऱ्यांनी सलग १५ दिवस मेहनत केली. रांगोळी सेवा, प्रसाद वाटप सेवा, अभिषेकाची व्यवस्था, दैनंदिन पूजा,सण, उत्सव,विविध उपक्रम हळू हळू मंदिरात सुरू झाले. नंतर एकदा सद्गुरूंनी आफळेबुवांना मंदिर बघायला बोलावले. त्यावेळी त्यांनी काढलेले उद्गार खूपच समर्पक आहेत. ते म्हणाले, “आपली मुलगी सुस्थळी पडल्यावर आई वडिलांना जो आनंद होतो तसा आज मला मंदिर बघून झाला आहे.” हे ऐकून सद्गुरू ती. अण्णा आनंदित झाले पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत. कितीही झाले तरी ह्या मंदिराचे बांधकाम खूप जुने होते. सद्गुरू ती. अण्णांनी त्यांचे जावई श्री. नित्यानंद घाटे व कन्या सौ. माधुरी घाटे यांना नवीन मंदिराचा आराखडा काढून दिला व त्यामागची संकल्पना सांगितली. भविष्यकाळात ही सेवा करायची आहे ह्याची ती नांदीच होती

सद्गुरू श्री लक्ष्मीसवरूप उर्फ ती. आईंच्या मार्गदर्शनाखाली ह्या नवीन मंदिराच्या बांधकामाचा . शुभारंभ झाला. २६ डिसेंबर २०१५ रोजी भूमिपूजन केले आणि केवळ तीन वर्षात जुन्या मंदिराच्या जागी तीन मजली भव्य मंदिर उभे राहिले. हे मंदिर म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार आहे. हजारो भक्तांनी ह्या राम मंदिराच्या बांधकामात तन,मन,धनाने खारीचा वाटा उचलला आहे. ह्या प्रकल्पासाठी अहोरात्र सेवा करणरे सेवेकरी हे मुंबईच्या उपनगरात राहून नोकऱ्या करणारी संसारी माणसं आहेत. रामरायाचे हे मंदिर सेवाभावाचे, सद्गुरूंवरील श्रद्धेचे आणि अपरंपार प्रेमाचे एक मूर्त स्वरूप आहे. सद्गुरू ती. अण्णांनी दिलेला स्वामीसेवेचा वारसा आजही असा अखंड चालू आहे. अशी आहे ही आजच्या काळातील लीलालाघवी श्री स्वामी समर्थांची अगाध लीला..!!

‘श्री गोविन्दानंद श्री राम मंदिराचे उद्घाटन, कळस पूजन आणि प्रतिष्ठापना समारंभ दिनांक १९ एप्रिल २०१९ रोजी करवीरपिठाच्या जगद्गुरू शंकराचार्यांच्या शुभहस्ते झाला. आजचे नव्या स्वरूपातील श्री राम मंदिर हे केवळ मंदिर नाही तर ही एक आध्यात्मिक, सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्य अशा त्रिविध उद्देशांची मठवास्तू झाली आहे. ही मठवास्तू डोंबिवली शहराचे भूषण ठरली आहे. समस्त नगरवासीयांनी सद्गुरू अण्णांवरील प्रेमापोटी ह्या मंदिराजवळील चौकाचे "श्री चैतन्य स्वरूप भालचन्द्र दत्तात्रेय उर्फ अण्णा लिमये चौक " असे नामकरण केले आहे

प्रवेशद्वाराशी आल्यानंतर लगेचच या मंदिराचे वेगळेपण मनात भरते. भल्या मोठ्या कमानीतून आत मध्ये आल्यानंतर डाव्या हाताला नुकत्याच झालेल्या कळसपूजनाची कोनशिळा दिसते. पुढे नवविधा भक्तीच्या पायऱ्या चढून आपण मुख्य सभामंडपाच्या दरवाजात पोहोचतो आणि दर्शन घडते राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे . सभामंडपातून आत जाताना दिसते वर टांगलेली भव्य मोठी घंटा . या महाकाय घंटेमुळे होणारा घंटानाद कसा असेल असा विचार करत आपली पावले पुढे सरकतात. हा घंटानाद फक्त रात्री ९ वाजता होतो.

रूढ मान्यतेनुसार ठराविक चौकोनी किंव्हा षटकोनी मंदिर व त्याच्या बंद भिंती या कल्पनेला तडा जातो कारण रूढ अर्थाने या सभागृहाला भिंतीच नाहीत. उजव्या बाजूस सर्व प्रथम दर्शन विघ्नहर्त्याचे होते. त्यानंतर श्री आदिमाया, श्री दुर्गादेवी, श्री आदिनाथ महादेव अन्नपुर्णेसह, श्रीराम पंचायतन, श्री विठ्ठल्राखुमाई, श्री दत्तगुरू, व योगेश्वर श्रीकृष्ण यांचे दर्शन घेत भक्तीचे प्रतिक असलेल्या ‘कासवाला’ स्पर्श करून आपण अनंत कोटी ब्रम्हांडनायका समोर, म्हणजे श्री स्वामी समर्थ माऊली समोर नतमस्तक होतो. त्या तसबिरीतील त्यांचा आश्वासक चेहेरा बघून मन शांत होते.. “भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे” याची पुन्हा एकदा प्रचीती येते. षट्कोनी, चौथऱ्यावर असलेले शिसवी लाकडातील अत्यंत देखणे मखर, अखंड तेवणारा नंदादीप, भगवा ध्वज, श्री स्वामी समर्थांच्या चांदीच्या पादुका व त्यासमोर संगमरवरी पादुका आहेत. त्याच्या मागील बाजूस असलेले श्री स्वामी समर्थांचे पट्टशिष्य सद्गुरू श्री बिडकर महाराज व त्यांचे शिष्य श्री बाबा म्हणजेच सद्गुरू श्री रावसाहेब सहस्त्रबुद्धे महाराज, श्री महालक्ष्मीची रेखीव तसबीर व तिथेच जागृत केलेले श्री लक्ष्मीयंत्र आहे. याच गुरुपरंपरेतील सद्गुरू श्री रावसाहेबांचे परमशिष्य म्हणजे आपल्या सर्वांचे सद्गुरू प. पू . चैतन्यस्वरूप श्री भालचंद्र दत्तात्रय लिमये उपाख्य अण्णा यांच्या तसबिरीसमोर आपोआपच नतमस्तक व्हायला होते.ह्या सर्वांच्या दर्शनाने मन शांत होते. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, श्री गोविन्दानंद श्रीराम मंदिर, भव्य श्री स्वामी समर्थ ग्रंथालय व नजीकच्या काळात उभा राहत असलेला “विश्वनाथ मेमोरिअल चिल्ड्रेन हॉस्पिटल” व या संस्थांकडून होत असलेले इतर सामाजिक कार्य यांचे प्रेरणास्थान असलेले हेच ते आमचे सद्गुरू श्री. अण्णा.

पुढे गाभाऱ्यातील रामपंचायतनाच्या समोर असलेली श्री मारुतीची गोंडस मूर्ती दिसते. पुढे संस्थेचे कार्यालय आहे. इथे भक्त आपल्या इच्छेनुसार विविध देवतांवर अभिषेक करू शकतात तसेच देणगी अर्पण करू शकतात.

मुख्य दरवाज्याच्या बाजूने तळघरात ध्यानमंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. इतक्या गजबजलेल्या वस्तीत इतकी शांत जागा ध्यानाला दुसरी नाही. त्यातूनही मन विचलीत झाले तर समोरच्या श्रीराम, श्रीलक्ष्मण, श्री सीतामाईच्या मूर्तीकडे बघून मनाला अथांग शांतता लाभते. तिथे घटकाभर बसून पुन्हा पायऱ्या चढून आपण मुख्य गाभाऱ्यात वर येत असताना जिन्यात श्रीरामरायाच्या ध्यानमंदिरातील चौथऱ्यात ज्या विविध वस्तू ठेवल्या आहेत त्याचा एक रेखीव फलक लावण्यात आला आहे.

पहिल्या मजल्यावर संस्थेचे भव्य व सुसज्ज असे 'श्री स्वामी समर्थ धार्मिक ग्रंथालय' आहे. ग्रंथालयात मुख्यत: धार्मिक विभाग, ऐतिहासिक विभाग, महिला विभाग,संगीत विभाग,वैद्यकीय विभाग आणि बाल विभाग आहेत व पुस्तकांचा व ज्ञानाचा खजिना आहे. अगदी चारही वेद व उपनिषदांपासून डॉ. जयंत नारळीकरांच्या वैज्ञानिक पुस्तकांपर्यंत विविधता येथे दिसून येते. बाहेरच वर्तमानपत्रे वाचण्यासाठी वेगळी राखीव जागा आहे. वाचनालयात प्रवेश करण्याआधी सद्गुरू अण्णा व आईंचे भव्य काचेचे विश्रांतिस्थान आहे.

दुसऱ्या मजल्यावर सद्गुरू श्री अण्णांच्या इच्छेनुसार विश्वनाथ मेमोरिअलची मुहूर्तमेढ म्हणून वैद्यकीय ओ. पी. डीची सर्व जय्यत तयारी झाली आहे. थोड्याच दिवसात ह्याचे उद्घाटन होईल व गरजूंना वैद्यकीय सेवा सुरु होईल. इथे नेत्राविशारद, दंत चिकित्सक, अस्थीरोगतज्ञ, मधुमेह तज्ञ, अशा अनेक डॉक्टरांच्या केबिन तयार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून “उद्वाहकाची” सोय केली आहे.

तिसऱ्या मजल्यावर एक भव्य सभागृह आहे इथे वैद्यकीय शिबिरे, व्याख्यानमाला, यांचे आयोजन केले जाते.

पर्यावरणाचा विचार करून गच्चीत सौरुर्जेचा प्रकल्प कार्यान्वईत केला आहे व या सगळ्याच्या वर भक्तीचा कळस आहे.

मंदिराच्या मागील बाजूस श्री स्वामी समर्थांना प्रिय असा एक भव्य मोठा अक्षय वटवृक्ष आहे. सायंकाळी इथे दीप लावला जातो.