परमपूज्य सद्गुरू श्री चैतन्यस्वरूप उपाख्य ती. अण्णा यांचे सद्गुरु परमपूज्य रावसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी १९५६ साली ती. अण्णांना " तू कोकणात जा आणि ते इंग्लंड कर" असे सांगितले होते. सद्गुरू ती. अण्णांनी ह्या वाक्यातील गूढार्थ लक्षात घेतला आणि कोकणातील गावासारखं डोंबिवली हे २२००० वस्तीचे छोटसं गाव त्यांची कर्मभूमी म्हणून निवडलं. 'श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ बांधायचा' ही परमहंस स्थितीला पोहोचलेल्या सद्गुरु ती. अण्णांची व सद्गुरु ती. आईंची गुरुसेवा होती. त्यांच्या सद्गुरूंना त्यांनी दिलेले वचन होते. सद्गुरूंच्या अथक प्रयत्नांनी १९९५ मध्ये नंदिवली येथे प्लॉट घेण्यात आला व १९९७ मार्चमध्ये मठाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरवात झाली.
मठवास्तूचे बांधकाम सुरू झाले तरी या संकल्पित मठाचा आराखडा Architectural Plan प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांनी सुमारे २५ वर्षापूर्वीच म्हणजे १९७४ मध्ये परमपूज्य तीर्थरूप अण्णांना सांगितला होता. त्याप्रमाणे सद्गुरू ती, अण्णांनी तो आराखडा कागदावर चितारला. नंतर हा आराखडा अनेक इंजिनियर, आर्किटेक्टनी पहिला आणि त्यातील वास्तुशास्त्राचे बारकावे व तपशीलवार नोंदी पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.
अजून एक विशेष घटना म्हणजे फेब्रुवारी १९७८ रोजी म्हणजेच मठ स्थापनेच्या सुमारे २० वर्ष आधीच सद्गुरू ती. अण्णांनी १९९९ ते २००० ह्या दरम्यान “डोंबिवलीच्या बाहेरील बाजूस मठाची व्यवस्था होईल” असे सांगितले होते. पुढे सद्गुरूंची ही भविष्यवाणी खरी ठरली.
३ डिसेंबर १९९९ रोजी करवीरपीठाधीश जगतगुरू शंकराचार्यांच्या मंगलहस्ते मठवास्तूचा कळसपूजन व प्रतिष्ठापना विधी संपन्न झाला. सदगुरूंनी वेगवेगळ्या स्तरातील उपासकांना, उपासनेसाठी माध्यमे आणि वास्तू निर्माण करून दिली होती. ती. अण्णांच्या वचनपूर्तीचा हा क्षण होता.ह्या दिवशी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आईच्या कळवळ्याने उपासनेचे महत्व सांगितले. “ह्या वास्तूचा लाभ घ्या आणि सद्गुरूंच्या पायाशी जन्मोजन्मी रहा”, असे सांगून मठाची जबाबदारी मुलांवर आणि उपासकांवर सोडली. हा सोहळा म्हणजे ती. अण्णांच्या उपासनेचा कळसच होता. कर्म करून, केवळ नामापुरते राहून त्यातून मुक्त असणाऱ्या कर्मयोग्याचे ते दर्शन होते
अशी ही नांदिवली येथील मठवास्तू म्हणजे आध्यात्मिक, सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्य अशा त्रिविध उद्देशांचा सुरेख संगम आहे. श्री स्वामी समर्थांच्यावरील प्रेमापोटी नगरवासीयांनी ह्या परिसराचे नामकरण “समर्थ नगर” असे केले आहे. ही मठवास्तू डोंबिवली शहराचे भूषण आहे. मठात येणाऱ्यांना येथील निरव शांतता प्रकर्षाने जाणवते व मनात सुद्धा “शांत-भाव” जागृत होतो. ह्या जागेत खूप वर्षांपूर्वी असंख्य ऋषी मुनींनी आपली तपश्चर्या तर केलीली आहेच पण येथे अनेक मंत्र शक्तींच्या लहरींचे नाद आजही घुमत असतात.
दर्शन कक्षाच्या भव्य गाभाऱ्यात श्री स्वामी समर्थांची मूर्ती चांदीच्या सिंहासनावर (मूळ शिसवी) विराजमान झाली आहे. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” ह्या आश्वासक शब्दाने मूर्तीकडे कुठूनही पाहता महाराजांची दृष्टी आपल्याकडेच पाहते आहे असा अनुभव येतो .गाभाऱ्याच्या वरील बाजूस साडेतीन शक्तीपिठातील चार देवींचे मनोहारी दर्शन घडते. गाभाऱ्यातील चौथऱ्यावर सिंहासनावरील छत्री, अखंड तेवणारा नंदादीप, महाराजांना प्रिय असणारी गुडगुडी, भगवा ध्वज, तांब्या-भांडे आणि चांदीच्या पादुका या गोष्टींचा समावेष आहे.गाभाऱ्याच्या डाव्या बाजूस श्री चैतन्यस्वरूप सद्गुरू अण्णा यांची उभी असलेली प्रतिमा व पादुका यांचे दर्शन घडते व उजव्या बाजूस ती.अण्णांना गौरवण्यात आलेले मानपत्र व त्यंच्या स्पर्शित वस्तूंचा संग्रह पहावयास मिळतो
याच गाभाऱ्याच्या डाव्या बाजूस अनेक ग्रंथांनी परिपूर्ण असलेले संदर्भ ग्रंथालय आहे . येथे सुमारे १८०० च्या वर अमूल्य, दुर्मिळ असे ग्रंथ आहेत. या मध्ये “विश्वकोश, संस्कृतिकोश, चार वेद, अवकाशज्ञान, ज्योतिषशास्त्र, ज्ञानेश्वरी, शब्दकोश, होमिओपॅथी” असे अनेक विषयांवरील संदर्भ ग्रंथ असून डॉक्टरेट मिळवण्यासाठी अनेक व्यक्तींना ही ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे संदर्भ ग्रंथालय म्हणजे नांदिवली मठरुपी ज्ञानमंदिराचा कळसच आहे. गाभार्याच्या उजव्या बाजूस कोठीघर आहे.
संजीवनी सभागृह :- भक्तांना शांती आणि समाधान देणारे सभागृह म्हणजेच संजीवनी सभागृह. या सभागृहात सर्व क्षेत्रातील कलाकारांना श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर सेवा सादर करण्यासाठी व्यासपीठाची सोय केली आहे. या सभागृहाच्या भिंतीवर भक्तांना वाचण्यासाठी आध्यात्मिक ग्रंथातील उतारे लावलेले असतात. प्रवेशद्वाराजवळ सुवाच्च हस्ताक्षरात फळ्यावर क्रमश: भक्तांकरिता संतचरित्र लिहिलेले असते.
सभागृहातून वर पाहताच नजरेस दिसतात ते अष्टसिद्धींचे नायक असणाऱ्या अष्टविनायकांच्या मूर्तींचे मनोहारी दर्शन. संजीवनी सभागृहाच्या छतामधे 'काच योजना' केली आहे. त्यावर बारा राशींचे कोरीव काम केलेले आहे.परमपूज्य सद्गुरु तीर्थरूप अण्णा उपासकांना सांगत, "दिवसातून एकदा तरी आकाशाकडे पहावे". याची आठवण सभागृहाची ही रचना आणि प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस दैनंदिन पंचांग व ग्रह ताऱ्यांची स्थिती दर्शवणारा फलक करून देतो.
संजीवनी सभागृहाच्या समोरील बाजूस मठाचे कार्यालय आहे. कार्यालयाच्या डाव्या बाजूस सद्गुरूंचे विश्रांतीस्थान आहे. व त्या समोर मंडळाच्या अध्यक्षांचे कार्यालय आहे.
मठाच्या सभोवताली हिरवाईने नटलेली अनेक फुलझाडे आहेत. याने संपूर्ण परिसर प्रसन्न व सुशोभित दिसतो. अंगणात उंबराच्या झाडाखाली महाराजांचा अत्यंत लाडका भक्त मलंग कासवाच्या रुपात स्थिरावला आहे. तेथून पुढे गेल्यावर दर्शन होते ते बहरलेल्या बिल्ववृक्षाचे व महादेवाच्या पिंडीचे..!! सद्गुरू तीर्थरूप अण्णांनी सद्गुरु तीर्थरूप आईंना सांगितले होते, “माझे चिरंतन अस्तित्व बिल्व वृक्षाखाली आहे.” असे हे बिल्ववृक्षाखाली असलेले सद्गुरूंचे आवडते विसाव्याचे स्थान.
त्यापुढेच थोड्या अंतरावर श्रीगणेशाची स्थापना केली आहे. तेथून पुढे सद्गुरूंच्या हस्ते मौजीबंधन झालेल्या प्राचीन अक्षय वटवृक्षाचे स्थान आहे. भक्त रक्षणासाठी सिद्ध असणाऱ्या स्वयंभु श्री काळभैरावांचे मंदिर वटवृक्षाच्या समोरच आहे. शेजारी निर्मला अन्नपूर्णा कुटी आहे. इथे जयंती उत्सव व गुरुपौर्णिमेला महाप्रसाद बनवण्यात येतो. अंगणात मांगल्याचे प्रतिक असणारे तुळशीवृंदावन आहे. डोंबिवली मधील पाण्याचा बिकट प्रश्न लक्षात घेऊन मठात बोअरवेलची सोय केली आहे. सद्गुरू ती. अण्णांनी ह्या बोरवेलचे नामकरण ‘सदगुरूंचे चरणतीर्थ’ असे केले आहे.
ही परिक्रमा पूर्ण करून उजव्या बाजूने वर आल्यावर सभागृहातील पहिल्या मजल्यावर नंदकिशोर संस्कार केंद्राचे कार्यालय आहे. त्याच्या उजव्या बाजूस दृक-श्र्याव्य विभाग आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना शास्त्रीय संगीत प्रिय होते. ती. अण्णा म्हणत, “माणसाने संगीताशिवाय जगू नये. अध्यात्म व संगीत अतिशय जवळजवळ आहेत.” मठात रोज संध्याकाळी समायोचित अशा राग-समयचक्रानुसार त्या त्या रागांवर आधारित शास्त्रीय संगीताच्या ध्वनीमुद्रिका लावल्या जातात व त्या संबंधीची माहिती दर्शन कक्षात फलकावर लिहिली जाते. मठातील राग-समयचक्राचे चित्ररूप सादरीकरण व प्रख्यात गायकांच्या घराण्याची माहिती या गोष्टी म्हणजे संगीत क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीस अमूल्य असा ठेवा आहे . याच मजल्यावर समोर आल्यावर मोठे बैठक कक्ष आहे. तेथे अनेक सभांचे आयोजन केले जाते.
दुसऱ्या मजल्यावरील गच्चीवर ती. अण्णांना साईबाबांनी दर्शन दिले होते. त्या स्थानावर छोटे साईबाबांचे मंदिर बांधले आहे. (मुंब्र्याची देवी व मलंगगड यांच्या मधोमध हे मंदिर आहे). दर्शन घेताना हे तिन्ही एका सरळ रेषेत आहे असे दिसते. त्या समोर अखंड फडकत राहणारा भगवा ध्वज आहे. सौरशक्तीच्या निर्मिती साठी सोलर सेल्स बसवले आहेत. ज्यावर मठातील सर्व विद्युत उपकरणे चालतात. एवढ्या भव्य वास्तूत फिरताना मनास भावते ती पराकोटीची स्वच्छता. मठाचा कोपरा अन कोपरा अत्यंत स्वच्छ ठेवला जातो
संजीवनी सभागृहाच्या खालील बाजूस मन:शांती देणारे ध्यानमंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यातील चौथऱ्यावर श्रीरामांचे पंचायतन आहे. सद्गुरू ती. आईंच्या वाढदिवशी ती. अण्णांनी चौथऱ्याच्या मोकळ्या जागेत ६२ नद्यांचे कलश, श्री स्वामी समर्थ नामाचा २ कोटीहून अधिक हस्तलिखित जप, गुरुलीलामृत पोथी,रुद्राक्ष माळ, एक पाट, भगवा ध्वज,चांदीची सोन्याची बिल्वपत्रे इत्यादि वस्तु ठेवल्या आहेत. ह्या वस्तु ठेवताना श्री स्वामी समर्थ सांगत होते तसा मंत्रोच्चार ती. अण्णा करत होते. या चौथऱ्याच्या खाली ज्या वस्तू ठेवल्या आहेत त्याचा एक रेखीव फलक पायऱ्या उतरताना दर्शनी भागात लावण्यात आला आहे. चौथऱ्याच्या डाव्या बाजूस मानसपूजा व उजव्या बाजूस रामरक्षेचा फलक आहे.
या मठ वास्तूतील ध्यानमंदिरात एक अनोखी मन:शांती अनुभवास येते. इथे एका वेळी २५० लोकांना ध्यानाला बसण्याची सोय केली आहे. आसने ठेवली आहेत. ध्यानमंदिरात जाताना मौन पाळावे लागते. वर वर पाहता एक साधा नियम आहे अशी भावना निर्माण होते परंतु मौन धरून आपण आसनस्थ झालो की मनाचे व्यवहार आपोआप बंद पडतात. आजकाल च्या धकाधकीच्या जीवनात निर्माण होणारे ताणतणाव नाहीसे करण्यासाठी मौन हे प्रभावी औषध आहे ही अनुभूती मिळते.