गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरूर्देवो महेश्वरा: ||
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: ||.
महर्षी व्यासांपासून अविरत चालत आलेली गुरुपरंपरा सर्व जगाला माहिती आहे
गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे ते सद्गुरू. गुरुंशिवाय जीवनाला गती नाही आणि अंती मोक्षही नाही. गुरूंचे स्थान आपल्या जीवनात अनन्य साधारण आहे. जीवाचे जीवपण नाहीसे करून सन्मार्गाला लावणारे ते सद्गुरू लोखंडाला परीसस्पर्श होऊन त्याचे सोने व्हावे तसेच साधकाच्या हिताकरिता योग्य मार्गदर्शन करून परमार्थाचे वाटसरू होण्यास सतत गुरूंची साधका विषयी तळमळ असते. त्यांच्या ठायी सौजन्यशीलता, प्रसन्नता, प्रामाणिकपणा, अंगीच असतो, नेमके तेच साधकाला जमावे हेच शिक्षण आयुष्यभर गुरूंकडून मिळावे म्हणजे सद्गुरूंच्या बोधाचा दिवा सतत जवळ बाळगला तर जीवनात कधीच अंधार होणार नाही.
गुरूंचा अनुग्रह झाल्याशिवाय जीवनातील इतर ज्ञानाला फारसे महत्व नाही. आपणासारिखे करिती तत्काळ या सर्व गोष्टी ज्यांनी आत्मसात करून अनेकांचे जीवन मार्गी लावले त्या महान विभूतींचे अलौकीक कार्य आपण पाहणार आहोत.
सद्गुरू चैतन्यस्वरूप भालचंद्र दत्तात्रेय लिमये (अण्णा) व सद्गुरू लाक्ष्मीस्वरूप सुषमा भालचंद्र लिमये (आई) या उभयतांनी सद्गुरू सेवेचा वारसा घालून दिला आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी दृढभावनेनी गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरु केला. अण्णांचे सद्गुरू रावसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या चरणी सशरण्य भावाने हि परंपरा पुढे अविरत चालू ठेवली. हि वैभवशाली परंपरा आपल्या मार्ग दर्शनाने अनेक मुमुक्षूंना भक्तिमार्गाला लावून स्वमिनामाच्या गोडीने जीवन सार्थकी लावले
सद्गुरूंच्या आत्मज्योतीशी आपली आत्मज्योत लावून भक्तांनी अनुभूती घेतली आणि आजही हीच परंपरा गुरुपौर्णिमेच्या दिवशी भक्तांना सद्गुरूंविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी अतिशय महत्वाची असते.
सकाळी ७ वाजता गणेशकृपेतून नांदिवली मठात पादुकांचे आगमन, त्यानंतर पादुका स्थानापन्न झाल्यावर मोठ्या समयांच्या ज्योती प्रज्वलित करून महाराजांच्या जयजयकाराने उत्सवास प्रारंभ. |
सकाळी ७.३० ते १० महापूजा, सहस्त्रनामावली मानसपूजा चिठ्यामध्ये ज्यांची नावे आली असतील ते दांपत्य याचे मानकरी असतात (गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सभेमध्ये चिठ्या काढून स्वामींच्या आदेशाने ज्यांची नावे आली असतील त्यांना पूजेचा मान देण्यात येतो. ). |
त्यानंतर आपल्या जीवनाचे सोने करणाऱ्या आणि सन्मार्गाच्या वाटेवरून आनंदाची अनुभूती देणारे सद्गुरू अण्णा व आई यांचे पाद्यपूजन त्यासाठीही चिठ्ठीत ज्याच्या भाग्यात ही सुवर्णसंधी येईल तेच त्याचे मानकरी होतात |
यानंतर सद्गुरू अण्णांनी ज्या साधकांना गुरुमंत्र दिलेला आहे तो तपासून योग्य ते मार्गदर्शन झाल्यावर गुरुमंत्राचा सामुहिक जप शांत डोळे मिटून ध्यान् मुद्रेत बसून जपला जातो. या मार्गदर्शनाने वेगळीच अनुभूती व उर्जेचा स्त्रोत मिळतो. त्यानंतर आशिर्वादपर सद्गुरूंचे अलौकिक विचार ऐकण्यास भक्तमंडळी उत्सुक असतात. विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे या एकाच दिवशी गुरूंच्या चरणांवर आपले मस्तक नमवून नमस्कार करण्याची ही संधी फक्त त्याच दिवशी मिळते |
दुपारी १२ वाजता नैवेद्य व महाप्रसादास सुरुवात होते |
दुपारी २.३० ते ४ वाजता यादिवशी मंडळातील सेवेकरी वृन्दानेच आपल्या सद्गुरूंना गुरुदक्षिणेच्या स्वरुपात भजन, गायन किंवा विवेचनांद्वारे ही शृंखला चरणी अर्पण करण्यास सुंदर आखणी केली जाते. आणि अशीच गुरुदक्षिणा गुरूंना अतिप्रिय असते. सद्गुरू कनवाळू होऊन शुद्ध हेतूने त्रैलोक्याचे राज्य देऊन टाकतात. |
संध्याकाळी ५ वाजता मंडळातील १० वी व १२ वीच्या यशवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात येतो. तसेच मंडळात सतत काही ना काही सेवा करून ती निदर्शनास न आणता नम्रतेनी पडद्यामागेच राहणेच पसंत करतात अशा सेवेकऱ्यांचा सत्कार केला जातो. आणि आता याच महान कार्यात आपले तन, मन प्रसंगी धनाने सक्रिय ज्येष्ठ व श्रेष्ठत्व सिद्ध करणारे सेवेकरी यांचाही यथोचित सत्कार संपन्न होतो. पंच्याहत्तरीच्या पुढील सेवेकरी असा हा भक्तीरंगी रंगणारा अपूर्व सोहळा गेली अनेक वर्षे अनेक कुटुंबे याचे साक्षीदार आहेत व आपली जीवनाची सार्थकता याच उद्धेशाने ह्या सेवा करीत आहेत |
सायंकाळी ६.३० ला सायं आरती करून पालखीचे प्रस्थान पुनश्च नांदिवली मठ वास्तूतून गणेशकृपेत सद्गुरूंच्या निवास्थानी विराजमान होते. |
श्री गुरुदेव प्रसन्न